आचार्य विनोबा भावे यांच्या शैक्षणिक चिंतनातील विद्यार्थी
DOI:
https://doi.org/10.7492/kk47x727Abstract
आजचा विद्यार्थी हा उद्याच्या राष्ट्राचे भविष्य आहे. एखाद्या घराची निर्मिती करीत असताना जसा त्याचा पाया मजबूत करावा लागतो तसेच राष्ट्राची निर्मिती करत असताना विद्यार्थ्यांचा वैचारिक पाया मजबूत करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विद्यार्थी जे शिक्षण घेतो त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याची देशाविषयीची सेवापरायण दृष्टी विकसित होणे महत्त्वाचे असते. यासाठी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना त्याचे कर्तव्य काय आहे याचा बोध होणे महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्याला जेव्हा त्याच्या विद्यार्थी जीवनाचा बोध होईल तेव्हा त्याला भविष्यात नेमके काय साध्य करायचे आहे याची जाणीव होईल. विद्यार्थ्यांनी कोणते विषय शिकले पाहिजे हेही याच कालखंडासाठी महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान हे चिरकाल टिकणारे असते म्हणून असे अनुभवावर आधारित ज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा जन्म हा परिश्रमातून ज्ञानप्राप्ती करण्यासाठी झालेला आहे त्यामुळे विद्यार्थी जीवनात अनुशासनाच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीचा मार्ग विद्यार्थ्यांनी स्वीकारण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे कर्तव्य, विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनात शिकत असताना आवश्यक असणारे विषय आणि विद्यार्थ्यांचे अनुशासन या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यातून आचार्य विनोबा भावे यांच्या शैक्षणिक चिंतनातील विद्यार्थी विषयक भूमिका ही अधिक स्पष्ट होते.